कोरोनाचा उद्रेक सुरूच...

देशातील कोरोनामृत्यूची संख्या २५ हजारांच्या उंबरठ्यावर 
-गेल्या एका दिवसात ३२ हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांची भर 
-६०६ कोरोनाबाधितांचा मृत्यू 

नवी दिल्ली, १६ जुलै

देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसागणिक ​कोरोनाबाधितांची उच्चांकी भर पडत आहे. कोरोनारुग्णांच्या मृत्यूसंख्येतही वाढ दिसून येत आहे. वैद्यकीय तज्ञांनी त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. नियंत्रण क्षेत्र धोरण तसेच भौतिक दूरत्वाच्या नियमाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन यानिमित्ताने केले जात आहे. गेल्या एका दिवसात देशभरात उच्चांकी ३२ हजारांहून अ​धिक कोरोनाग्रस्तांची भर पडली. तर, ६०० हून अधिक कोरोनारूग्णांचा बळी गेल्या. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले आहे. 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार गुरुवारी सकाळपर्यंत देशात तब्बल ३२ हजार ६९५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर, ६०६ रूग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे यादरम्यान २० हजार ७८३ रुग्णांनी कोरोनवर मात मिळवल्याने त्यांना विविध रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ९ लाख ६८ हजार ८७६ झाली आहे. यातील ६ लाख १२ हजार ८१५ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर, ३ लाख ३१ हजार १४६ रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत २४ हजार ९१५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनामुक्तीचा दर ६३.२५% झाला आहे. तर, कोरोनामुक्ती तसेच मृत्यूचे प्रमाण हे अनुक्रम ९६.०९ % तसेच ३.९१ % नोंदवण्यात आले आहे.
सर्वाधिक कोरोनाप्रभावित  महाराष्ट्रासह (७,९७५), तामिळनाडू (४,४९६), कर्नाटक (३,१७६), आंधप्रदेश (२,४३२), दिल्ली (१,६४७), उत्तरप्रदेश (१,६५९) तसेच पश्चिम बंगालमध्ये (१,५८९) कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. या राज्यांच्या पाठोपाठ तेलंगणा (१,५९७), बिहार (१,३२८), गुजरात (९१५), राजस्थान (८६६), केरळ (६२३) तसेच मध्यप्रदेशात (६३८) कोरोनाबाधितांची भर पडली.
गेल्या एका दिवसात महाराष्ट्रात सर्वाधिक २३३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. महाराष्ट्रा पाठोपाठ कर्नाटक ८७, तामिळनाडू ६८, आंध प्रदेश ४४, दिल्ली ४१, पश्चिम बंगाल २०, तेलंगणा ११, गुजरात १० तसेच मध्यप्रदेशात ९ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील मृत्यूदर हा ४ टक्के नोंदवण्यात आला आहे. तर, जगाच्या ४.४० टक्के मृत्यूदराच्या तुलनेत गुजरात मधील कोरोना मृत्यूदर सर्वाधिक म्हणजे ४.७५ टक्के नोंदवण्यात आला आहे. 
बुधवारी दिवसभरात देशातील तब्बल ३ लाख २६ हजार ८२६ नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशात १ कोटी २७ लाख ३९ हजार ४९० नागरिकांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 

बीएसएफ मधील ६८ जवानांना कोरोनाची लागण 
गेल्या एका दिवसात बीएसएफ मधील ६८ जवानांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बीएसएफ मधील कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे २ हजार ९३ झाली असून यातील १ हजार ६० जवानांनी कोरोनावर मात मिळवली आहे. १ हजार २४ जवानांवर उपचार सुरु आहेत.तर, आयटीबीपी मध्ये ३५ जवानांमध्ये कोरोना संसर्ग आढळला आहे. आयटीबीपीतील ३५६ जवानांनी कोरोनावर मात मिळवली आहे. ३४८ जवानांवर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. 

कोरोनामुळे आतापर्यंत ९९ डॉक्टरांचा मृत्यू, रेड अलर्ट जारी 
कोरोना संसर्गासोबत दोन हात करतांना आतापर्यंत देशभरात ९९ डॉक्टरांचया मृत्यू झाला आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) कडून देण्यात आली आहे. आयएमए ने त्यामुळे रेड अलर्ट काढून रुग्णालय तसेच ​वैद्यकीय प्रशासकांना डॉक्टरांना कोरोनाचा प्रार्दुभाव होवू नय यासाठी काळजी घेण्याची विनंती करण्यात आली आहे. आयएमअकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार कोरोनाविरोधातील युद्धात आघाडीवर लढत असलेल्या १ हजार ३०२ डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली. तर, ९९ डॉक्टरांचा मृत्यू झाला. यातील ७३ डॉक्टरांचे वय हे ५० वर्षांहून जास्त नव्हते. ३५ ते ५० वयोगटातील १९ आणि ३५ हून कमी वय असलेल्या सात डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती आयएमए कडून देण्यात आली आहे. 

Comments