कोरोनामृत्यू संख्येने ओलांडला १ लाख २० हजारांचा उंबरठा !

गेल्या एका दिवसात ५० हजार नवीन कोरोनाग्रस्तांची भर; ५१७ रुग्णांचा मृत्यू 

नवी दिल्ली, २९ ऑक्टोबर, सुमेध बनसोड

कोरोना महारोगराईने भारतात आतापर्यंत १ लाख २० हजार ५२७ रुग्णांचा बळी घेतला आहे. बुधवारी दिवसभरात ५१७ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामृत्यूचे प्रमाण त्यामुळे १.५०% एवढे नोंदवण्यात आले. असे असले तरी देशाचा मृत्यूदर हा जगातील इतर देशांच्या तुलनेत बराच कमी असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. गेल्या एका दिवसात देशात ४९ हजार ४८० नवीन रुग्णांची भर पडली. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ५६ हजार ४८० रुग्ण कोरोनातून पुर्णत: बरे झाले. एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ८० लाख ४० हजार २०३ एवढी झाली असली तरी, यातील ७३ लाख १५ हजार ९८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ६ लाख ३ हजार ६८७ रुग्णांवर (७.५१%) उपचार सुरु आहेत. 
गेल्या एका दिवसात सक्रिय रुग्णसंख्येत ७ हजार ११६ ची घट नोंदवण्यात आली आहे. देशाचा कोरोनामुक्तीदर गुरुवारी ९०.९९% नोंदवण्यात आला.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार गेल्या एका दिवसात केरळमध्ये सर्वाधिक ८ हजार ७९० कोरोनारुग्णांची भर पडली. केरळ सह महाराष्ट्र (६,७३८), दिल्ली (५,६७३), पश्चिम बंगाल (३,९२४), कर्नाटक (३,१४६), आंध्रप्रदेश (२,९४९) तसेच तामिळनाडूत (२,५१६) सर्वाधिक कोरोनाबाधितांची भर पडली.देशात आतापर्यंत १० कोटी ६५ लाख ६३ हजार ४४० कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील १० लाख ७५ हजार ७६० कोरोना तपासण्या या बुधवारी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली. 

गत सहा आठवड्यात कोरोनामृत्यू दैनंदिन सरासरी  
     दिनांक           सरासरी कोरोनामृत्यू 
१) १६ ते २२ सप्टें.           १,१६५ 
२) २३ ते २९ सप्टें.           १,०५४
३) ३० सप्टें. ते ६ ऑक्टो.  १,०३५ 
४) ७ ते १३ ऑक्टो.         ८९८  
५) १४ ते २० ऑक्टो        ७६३
६) २१ ते २७ ऑक्टो       ६१५ 

सर्वाधिक सक्रिय रुग्ण या राज्यात 
     राज्य        सक्रिय रुग्ण
१) महाराष्ट्र       १,३०,२८६ 
२) केरळ          ९३,३६९
३) कर्नाटक       ६८,१८०
४) पश्चिम बंगाल  ३७,१११
५) दिल्ली            २९,३७८ 

Comments